ग्वांगडॉंग(Guangdong) हा चीनमधे अगदी दक्षिणेला असलेला प्रांत आहे. या प्रांतातल्या लिऍंगचिऍओ(Liangqiao) या शहराच्या दक्षिणेला शांगबा(Shangba) नावाचे अंदाजे 3300 वस्तीचे एक खेडेगाव आहे. प्रथमदर्शनी हे गावे म्हणजे ऊस आणि तांदुळाच्या शेतांमधे लपलेले एक छानसे खेडेगाव वाटते. परंतु आज हे गाव कर्करोगींचे गाव या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे.
1987 पासून या गावातले 250 तरी गावकरी कर्करोगाचे शिकार बनले आहेत. गावात होणार्या मृत्युपैकी 80 टक्के तरी मृत्यु, जठर किंवा पचनसंस्थेच्या कर्करोगाला बळी पडलेले आहेत. या शिवाय या गावातले बहुसंख्य लोक, त्वचा रोग व मूतखड्याच्या विकारांनी पछाडलेले आहेत. या गावाजवळूनच वहात असलेल्या हेंगशुई(Hengshui)या नदीचे पाणी आणि गावाजवळचे भूजल या रोगांना कारणीभूत झालेले आहे. या नदीला आता मृत्युची नदी या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे. या नदीचे पाणी एवढे प्रदुषित झालेले आहे की कोणताही जलचर प्राणी या नदीत 24 तासापेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही.
या गावाजवळ एक छोटे धरण या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेले आहे. या धरणातून पुरवले जाणारे पाणी जेंव्हा गावातल्या नळांच्यातून बाहेर येते तेंव्हा ते अशुद्ध व पूर्ण मातकट रंगाचे असते कारण कोणतीच जलशुद्धीकरण योजना येथे बसवलेली नाही. या सगळ्या प्रदुषणाचा उगम या गावाच्या जवळच असलेल्या डबाओशान(Dabaoshan) येथल्या जस्त, तांबे व लोखंडाच्या खाणी हा आहे. मागच्या वर्षी या सरकारी मालकीच्या खाणींनी 6000 टन तांब्याचे व 850000 टन लोह खनिज खाणीबाहेर काढले. या खाणींमधून निघणारे सांडपाणी हेंगशुई नदीच्या पाण्यात मिसळते. या सांडपाण्यामुळेच शांगबा गावाच्या जवळच्या शेतामधून निघणार्या शेतीमालात, कॅडमियम धातूचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. या शेतात पिकलेला तांदूळ चवीलाही विचित्रच लागतो असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
या भागातील शेतकरी मागासलेले आणि गरीबच आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हे प्रदुषित पाणी व तांदुळ यांचा सामना करावा लागत असल्याने रोगराई आणि मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. परिस्थिती एवढी गंभीर होत चालली आहे की एखादा गावकरी आजारी पडला तर बहुतांशी निदान, कर्करोगाचेच असते.
काही गावकर्यांनी या प्रदुषित पाण्याचा वापर टाळण्यासाठी, जवळच्या उंच डोंगरावर जाऊन वर असलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी आणण्यास सुरवात केली आहे परंतु हे काम अतिशय कष्टप्रद आहे. या गावकर्यांना पाणी जरी शुद्ध मिळाले तरी त्यांना, त्यांच्याच शेतात पिकलेला व कॅडमियम सारख्या धातूंनी प्रदुषित झालेला, तांदुळच खावा लागत असल्याने कर्करोगाचे सावट त्यांच्यावरही आहेच.
सरकारी खाणींनी गावकर्यांना वैद्यकीय मदत देऊ केली आहे पण कर्करोगासारख्या आजाराच्या उपचारासाठी जो प्रचंड खर्च येतो त्या खर्चाच्या एक टक्का सुद्धा ही मदत नसते.
सर्व जगाचे चीन हे वर्कशॉप आहे असे चिनी सरकार मोठ्या गर्वाने सांगते पण हे वर्कशॉप चालवण्यासाठी प्रदुषणाची कोणती भयानक किंमत चिनी गरिबांना द्यावी लागते आहे याचे हे एक उदाहरण आहे. एकाधिकार शासनात निर्णय भरभर घेतले जाऊ शकतात. पण लोकशाहीत असलेला विविध दबावगटांचा प्रभाव चीनमधे नसल्याने घेतलेला निर्णयाचे किती भयावह परिणाम नंतर होऊ शकतात याचे शांगबा गाव एक दुर्दैवी उदाहरण आहे असेच म्हणावे लागते.
19 सप्टेंबर 2009
No comments:
Post a Comment